मुंबई,दि.16: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत आणि कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता असेल.
विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी खलबतं सुरु आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर 24 तासांमध्येच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर जुन्या मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडली आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकांमधील जागावाटपावर जानकर नाराज होते, अशी चर्चा आहे. त्या नाराजीतूनच त्यांनी महायुतीमधून बाहेर पडत स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
महादेव जानकर महायुती सोडणार ही शक्यता लोकसभा निवडणुकीपूर्वीही व्यक्त केली जात होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांची जागावाटपाबाबत चर्चाही सुरु होती. पण, शेवटच्या क्षणी त्यांना आपल्याकडं राखण्यात महायुतीला यश आलं. महायुतीनं लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा त्यांच्यासाठी सोडली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.