सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात: दीपक केसरकर

0

मुंबई,दि.७: सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात आहेत असे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून (८ एप्रिल) दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे या अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये अयोध्येतील महाराष्ट्र भवनाबद्दल सकारात्मक चर्चा होईल.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अयोध्येत जे मराठी बांधव जातील, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी तिथे मोठं महाराष्ट्र भवन बांधण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतील. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा होईल.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून होत आहे. याबद्दल दीपक केसरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगूनही ते आले नाहीत, उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिलेलं वचन मोडलं याचा मी साक्षीदार. दोन्ही पक्षांमध्ये (शिवसेना आणि भाजपा) काही जुळवायचं असेल तर ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.

सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात

केसरकर म्हणाले की, मागे एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिला होता. पण त्यांनी ऐकलं नाही. एकनाथ शिंदे सध्या राज्यात चांगलं काम करत आहेत. मुळात उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं. परंतु त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर मुख्यमंत्री होण्यासाठी दबाव टाकला, असं उद्धव साहेबांनी सांगितलं. अन्यथा आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असते. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं फारसं वाईट वाटलं नसेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here