‘आता त्यांनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही…’ पंकजा मुंडे

0

बीड,दि.28: मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी मान्य करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता अनेकांनी आत्महत्त्या केल्या आहेत. सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आहे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप नोंदवला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशबाबत १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या काळात काय आक्षेप येतात, ते कायद्यात बसेल हे पाहावे लागेल. मराठा समाजाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी वेळोवेळी भूमिका राहिली आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

आता त्यांनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही

जेव्हा या अध्यादेशावर शिक्कामोर्तब होईल तेव्हा खऱ्याअर्थाने अभिनंदन करण्याची गरज आहे. आता कुणबी प्रमाणपत्रे घेऊन मराठा समाजातील एक पिढी ओबीसीत आलेली आहे. आता त्यांनी एक मराठा, लाख मराठा म्हणायची गरज नाही. आता त्यांनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही असं मला वाटते. यामुळे त्यांचा विजय नकारात्मक वाटणार नाही. लोकांच्या मनावर कुठलाही ओरघडा ओढला जाणार नाही असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

या अध्यादेशात मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी मांडल्या होत्या. त्यातील एका मागणीवर महत्त्वाचा प्रकाश टाकला जाईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावे. यात सगेसोयरे यांची व्याख्या केली आहे. आजही लाखो कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी सकारात्मक मार्ग मिळाला आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा हे साध्य करायला मनोज जरांगे यशस्वी झालेत हे म्हणायला हरकत नाही असं त्यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here