मुंबई,दि.२३: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसाचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांचे, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने 1300 कोटींहून अधिकचं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. यासंदर्भातील शासन आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीने 70 लाख एकरवरील पीकांचे नुकसान झाले आहे.
पीक नुकसानीसाठी मदत म्हणून 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मदत व पूनर्वसन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला. खरीप 2025 साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
1. जून, 2025 ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत “अतिवृष्टी व पूर” यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1339 कोटी 49 लाख 25 हजार रुपये (रूपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.








