महाराष्ट्र कर्नाटक वाद | शिंदे गटाचा राष्ट्रवादीवर सीमावादावरून गंभीर आरोप

महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरू असताना नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे

0

मुंबई,दि.2: महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरू असताना शिंदे गटाने राष्ट्रवादीवर सीमावादावरून गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बॉ यांनी केले होते. त्यानंतर बसवराज बोम्मई यांनी सोलापूर व अक्कलकोटवर दावा सांगितला होता. सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकचं समर्थन केले आहे. याठिकाणी गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहोत अशी भूमिका मांडलीय. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. महाराष्ट्रातील गावांना वेगळ करण्यासाठी राष्ट्रवादीनं फूस लावली आहे असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

राष्ट्रवादी जातीपातीचं राजकारण करतेय

नरेश म्हस्के यांनी म्हटलंय की, राष्ट्रवादी जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतेय. महाराष्ट्रात काही गावं वेगळं होण्याची भाषा करत आहेत. या गावात याआधी समस्या नव्हत्या का? गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे लोक असमर्थ राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता पाऊल उचललं. मात्र या गावांना महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी राष्ट्रवादीकडून फूस लावली जात आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्र तोडण्याचा डाव आखतेय. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी केला. 

शरद पवार कधी कोणत्या गडकिल्ल्यावर गेलेत का?

तसेच सध्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष राजकारण करतेय. शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज काय? असं विधान केले होते. त्यात शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गजभिये यांनी छत्रपतींचा वेष परिधान करून ऐऱ्यागैऱ्यांना मुजरा करत होते. त्यावेळी छत्रपतींचा अपमान झाला नाही का? शाहिस्तेखानाचा देखावा करताना छत्रपती शिवाजी महाराजांना शरद मुखचंद्र लावून राष्ट्रवादीने अधिकृत ट्विट केले होते. छत्रपतींची तुलना पवारांनी केली होती. शरद पवार कधी कोणत्या गडकिल्ल्यावर गेलेत का? सत्तेत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय केले? असंही नरेश म्हस्केंनी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारलं. 

जातीपातीचं राजकारण हेच राष्ट्रवादीचं काम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्यांनी छत्रपतींचा अपमान केला नाही का? औरंग्याच्या कबरीवर हे फुले वाहतात. त्याचे जतन करतात हा अपमान नाही का? ज्यांनी निष्पाप लोकांच्या घरावर डल्ला मारला. त्या राऊताला अटक झाल्यानंतर सुषमा अंधारेंनी कहर म्हणजे एका गुन्हेगाराच्या आईची तुलना जिजाऊंशी केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला नाही का? टिपू सुलतानच्या नावाने मुंबईत उद्याने करता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं. छत्रपतींची तुलना कुणाचीही होऊ शकत नाही. समाजात तेढ निर्माण करणे, जातीपातीचं राजकारण हेच राष्ट्रवादीचं काम आहे अशा शब्दात म्हस्केंनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here