maharashtra: जयंत पाटील यांनी AIMIM च्या भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याच्या आवाहनाला दिले हे उत्तर

0

मुंबई,दि.१९: maharashtra: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने भाजपाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीबरोबर एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. AIMIM चे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्यात एक बैठक झाल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची ऑफर दिली होती. एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे.

AIMIM ची ऑफर शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी धुडकावून लावली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. तसेच, एमआयएमने आधी ते भाजपाची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान देखील जयंत पाटील यांनी दिलं आहे.

राजेश टोपे आपल्या घरी आले असता त्यांना युती करण्याबाबत ऑफर दिल्याचं इम्तियाज जलील म्हणाले होते. तसेच, “आमच्यावर नेहमीच भाजपाची बी टीम म्हणून टीका केली जाते. पण आता आम्ही भाजपाला हरवण्यासाठी तुम्हाला युतीची ऑफर दिली आहे, तुम्ही तुमची भूमिका सिद्ध करा. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो”, असं देखील इम्तियाज जलील म्हणाले होते. त्यावर आता जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीची अशी संस्कृती नाही

“राजेश टोपे इम्तियाज जलील यांच्याकडे गेले होते. त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं म्हणून ते गेले होते. अशा वेळी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही. मला खात्री आहे की राजेश टोपेंनी तशी ती केलेली नसेल. त्यांच्याघरी कुणाचं निधन झालं असताना राष्ट्रवादीची अशी संस्कृती नाही की तिथे राजकीय चर्चा केली जाईल. त्यामुळे अशा चर्चेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

निवडणुकीत कळेलच

“आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रात त्यांचा बी टीम होण्याचाच प्रयत्न होता हे सिद्ध झालं आहे. ते बी टीम नसतील, तर मग आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून आपल्या लक्षात येईल की ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत की भाजपाच्या विजयासाठी उत्सुक आहेत”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी एमआयएमला आव्हान दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here