लाडकी बहीण योजनेसाठी हे सर्व निकष येणार तपासण्यात

0

मुंबई,दि.30: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रूपये देण्यात आले. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रूपये देण्यात येणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे भाजपाला व महायुतीला फायदा झाल्याचे बोलले जात आहे. 

महायुती सरकारच्या लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट दीड हजार रुपये जमा केले.

महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात ‘लाडकी बहीण योजने’त 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18 हजार कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निकष तपासण्यात येणार असल्याचे वृत्त दैनिक सामनाने दिले आहे.

हे सर्व निकष तपासले जाणार 

आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्तीवेतन, चारचाकी वाहने आणि पाच एकरपेक्षा कमी जमीन असे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली, त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्यावर येईल असा अंदाज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here