Maharashtra Crisis: गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

0

दि.22: Maharashtra Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा दावा केला आहे. राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं.

महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ 35 नाही, तर 40 शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी 10 आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, “शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत.” पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत.” तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांची काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. पण एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण एकनाथ शिंदे अजूनही भाजपासोबत सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहेत. 

या आधी सूरतमधील मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी सेना आमदारांनी कोणतंही बंड केलेलं नाही किंवा आम्ही पक्षही सोडलेला नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चारही एकनाथ शिंदेंनी केला. दरम्यान भाजपचे मोहीत कंबोज सर्व आमदारांसह गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती आहे. तसेच, सध्या एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर आमदारांसोबत भाजपचे काही पदाधिकारी जे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात ते देखील उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here