महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात

0

भंडारा,दि.10: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहराजवळील कारदा गावाजवळ अपघात झाला. एका ट्रकने त्यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

काँग्रेस नेत्याने भाजपवर निशाणा साधला 

या घटनेवरून काँग्रेस नेत्याने भाजपवर गंभीर आरोप केले. अतुल लोंढे पाटील यांनी Xवर लिहिले आहे की, नाना पटोले यांच्या कारला ट्रकने धडक दिली, ही अत्यंत गंभीर बाब असून, हा अपघात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता की काय अशी शंका आहे? जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोले यांना काहीही झाले नाही.

X पोस्टमध्ये लोंढे यांनी सांगितले की, भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ हा अपघात झाला. हा घातपात आहे की नाही, हे आमच्या लक्षात आणून द्या असा आग्रही सूर लोंढे यांनी आळवला. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पटोले यांची सुरक्षा सरकार बदलल्यानंतर काढण्यात आली, किंबहुना प्रत्येक काँग्रेस नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आली त्यामुळं इथं शंकेला वाव मिळत असल्याचं म्हणत अतुल लोंढे यांनी पुन्हा एकदा अपघाताचा संदर्भ दिला.  सुदैवानं कारला एका बाजूनं धडक बसल्यामुळं मोठं संकट टळलं अन्यथा… अशा शब्दांत त्यांनी घटनेचं गांभीर्य एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना व्यक्त केलं

मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. नाना पटोले सतत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक होत आहे. सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया 

भंडाऱ्याजवळ आपल्या वाहनाला एका ट्रकनं जाणीवपूर्वक धडक मारण्याचा प्रयत्न केला ज्यामुळं कारला एका बाजूनं ट्रकनं घासत पुढे नेलं. सुदैवानं आपल्याला काही इजा झाली नाही. जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळं मी सुरक्षित असल्याची, प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here