मुंबई,दि.4: Attack On Sandeep Deshpande: मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. देशपांडे यांच्यावर 4 अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. शिवाजी पार्क परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली. देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या तिघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे शुक्रवारी घडली. शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आठ पथके तैनात करत तपास सुरू केला आहे.
देशपांडे हे नियमितपणे शिवाजी पार्क येथे मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला येतात. वॉक झाल्यानंतर सगळे एकत्रित नाक्यावर भेटतात. शुक्रवारी सकाळी देशपांडे नेहमीप्रमाणे वॉक करत असताना मास्क लावून आलेल्या त्रिकुटाने त्यांच्यावर हल्ला केला. स्टम्प आणि बॅटने त्यांना मारहाण करत हल्लेखोर पळून गेले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हल्लेखाेर म्हणाले, ठाकरेंना नडतोस का? | Attack On Sandeep Deshpande
संदीप देशपांडे यांनी जबाबात म्हटले आहे की, सकाळी नेहमीप्रमाणे 6.50 च्या सुमारास माहीम येथील घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्क मैदानाकडे निघालो. मैदानाचे गेट क्रमांक 5 येथे सातच्या सुमारास पोहोचलो.
मात्र, अन्य मित्र आले नव्हते. म्हणून एकट्यानेच वॉक सुरू केले. मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाच्या गेट 5 कडून पुढे येताच, कुणीतरी मागून उजव्या पायाच्या मांडीवर फटका मारला म्हणून मागे वळून पाहताच चार तरुण दिसले. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बॅट होते.
शिव्या घालून पत्र लिहितोस का? ठाकरेंना नडतोस का? वरुणला नडतोस का?, असे विचारत मारहाण केली. स्थानिकांनी मध्यस्थी केली. त्यांनाही ओरडून धमकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची पळापळ झाली.
देशपांडे यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर
स्थानिकांच्या मदतीने देशपांडे यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. देशपांडे यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे, तर डाव्या पायाला दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देशपांडे यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते माहीम येथील घरी आले. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कसबे यांनी घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
त्यानुसार, तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत.