मुंबई,दि.३१: Anil Parab On Kirit Somaiya: शिवसेना (ठाकरे) नेते आमदार अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना खुलं आव्हान दिलं आहे. अनिल परब (Anil Parab) यांचं अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं, त्या ठिकाणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) जाणार आहेत. या सगळ्याच्या आधी माजी मंत्री अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली आणि पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवर आरोप केले आहेत.
किरीट सोमय्या यांनी बिल्डर्सकडून सुपारी घेतली | Anil Parab On Kirit Somaiya
किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे. हा किरीट सोमय्या जे काही करतो आहे त्याला भाजपाचं समर्थन आहे का? असाही प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे. तसंच किरीट सोमय्या इथे येऊ द्या त्याचं स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू कारण मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराच अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.
काय म्हणाले अनिल परब? | Anil Parab
सोमवारपासून एक बातमी वृत्तवाहिन्यांवर देण्यात येते आहे. अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय तोडलं गेलं. ही इमारत १९६० मध्ये बांधण्यात आली. माझा जन्म याच इमारतीत झाला. या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा या इमारती या आता मालकीच्या झाल्या म्हाडाकडे राहिल्या नाहीत असं मला इमारतीच्या लोकांनीच सांगितलं. माझं कार्यालय इथेच होतं. अनेक वर्षे ही जागा मी वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली असं अनिल परब यांनी सांगितलं. किरीट सोमय्याने बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे असाही आरोप अनिल परब यांनी केला आहे.
म्हाडावर किरीट सोमय्यांनी दबाव टाकला
नोटीसला उत्तर देताना सांगितलं की सदर जागा माझी नाही. सोसायटीची आहे. त्यानंतर मला पाठवण्यात आलेली नोटीस म्हाडाने मागे घेतली. यानंतर इमारतीतले रहिवासी कोर्टात गेले. त्यांनी सांगितलं की रेग्युलरायझेशनसाठी तुम्ही अर्ज केला. तसा अर्ज करण्यात आला. आम्ही म्हाडाला हे सांगितलं. म्हाडाने हे रेग्युलराईज करता येणार नाही सांगितलं. किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. त्यानंतर या जागा इमारतीने स्वतःहून मोकळ्या केल्या. गरीब मराठी माणूस या विभागात राहतो. त्यांची ही जागा आहे. ही जागा सोसायटीची आहे. म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत ज्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. त्यात अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना मूळ घरं २२० स्क्वेअर फूटचीच घरं द्यायची या हेतून किरीट सोमय्यांना बिल्डर्संकडून सुपारी घेतली असावी असाही आरोप अनिल परब यांनी केला.
आज प्रत्येकाच्या मनात ब्लॅकमेलिंगची भीती
आज प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे की या ऑर्डरचा फायदा घेऊन ब्लॅकमेल केलं जाईल असं वाटतं आहे. आम्ही म्हाडालाही याबाबतचा जाब विचारणार आहोत असंही अनिल परब आहे. २० वर्षांपूर्वीचं एक प्रकरण अजून म्हाडाकडे पेंडिंग आहे. किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. माझ्यासोबत किरीट सोमय्या ती तोडक कारवाई बघायला येणार का? असाही खोचक प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे. मी म्हाडाला जागा मोकळी केल्याचं पत्रही दिलं आहे.
किरीट सोमय्या म्हाडाचे अधिकारी आहेत का?
किरीट सोमय्या कोण आहे? म्हाडाचे अधिकारी आहेत का? ते इथे का येणार आहेत असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. आम्ही किरीट सोमय्यांना आव्हान देतो आहे हिंमत असेल तर ये इकडे तुझं स्वागत करायला आम्ही तयार आहोत असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. गरीब कुटुंबाचं नुकसान कुणी करणार असेल तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही. गरीबांच्या पोटावर भाजपा आणि किरीट सोमय्या येणार असतील आम्ही कुणीही शांत बसणार नाही. मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे असंही अनिल परब यांनी सांगितलं.