छत्रपती संभाजीनगर,दि.22: ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उद्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात ठाकरे गटाची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आताही मुख्यमंत्री राहिले असते मात्र त्यांनी आमदार जाऊ दिले, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावर आता दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले? | Ambadas Danve
अजित पवारांच्या म्हणण्यात तथ्य असले तरी हाच ठाकरी बाणा आहे, जे जातील त्याला जाऊ द्या पुन्हा शिवसेना मोठी करू. त्यांचे मन तिकडे आणि शरीर इकडे होते, त्याचमुळे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना अडवण्याची भूमिका घेतली नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
गुलाबराव पाटलांना इशारा
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील यांनी मस्तीची भाषा करू नये. सभेत घुसलात तर परत जाणार नाहीत. ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी आहेत. आम्हाला त्यांच्या सभेत घुसता येत नाही का.? त्यामुळे दादागिरीची भाषा करू नये असा इशारा दानवे यांनी दिला आहे.
जळगावात पोलिसांकडून ठाकरे गटाचे बॅनर हटवण्यात आले आहेत. आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परवानगी घेऊन बॅनर्स लावले असतील तर ते काढता कामा नये, परवानगीशिवाय लावलेअसतील तर ठीक आहे. याबाबत अधिक माहिती घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.