Ajit Pawar On Raj Thackeray: यामधून राज ठाकरे समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा: अजित पवार

0

मुंबई,दि.७: Ajit Pawar On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत असताना अजित पवारांवर टीका केली. तसंच त्यांची मिमिक्रीही केली. याबाबत आज अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी राज ठाकरेंनी मिमिक्रीशिवाय दुसरं काय जमतं असा प्रश्न करत राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar On Raj Thackeray

राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण जनतेने त्यांना नाकारलं आहे. त्यांनी मागे एकदा निवडणुकीत १४ आमदार निवडून आणले. दुसऱ्यांदा फक्त एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरदराव सोनावणेंनी त्यांचं तिकिट घेतलं म्हणून तेवढी एक पाटी लागली. नंतर आमचे कल्याणचे सहकारी निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत जे लोक होते त्यापैकी काही लोक सोडले तर सगळे त्यांच्यापासून दूर गेले आहेत.

यामधून राज ठाकरे समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा

राज ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी अजित पवारची मिमिक्री करणं आणि अजित पवारचं व्यंगचित्र काढणं यात त्यांना समाधान वाटतं आहे. यामधून राज ठाकरे समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले, अजित पवार हे शरद पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी जसं वागत होते, ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिलं. ‘ए तू गप्प बस’, ‘ए तू शांत बस’, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असं सगळं त्यांचं सुरू होतं. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होतं.

अजित पवार जे काही वागले ते सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार. अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस (अजित पवार) असा वागतोय. खरंच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मला पण म्हणेल ए गप्प बस. त्या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको. असं म्हणत त्यांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली होती. त्यानंतर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here