एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना धक्का, बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई,दि.30: बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Mahant Sunil Maharaj) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत असलेले तत्कालीन शिवसेना नेते आणि सध्याचे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांना मोठा धक्का बसणार आहे. बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती.

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवीचे सुनील महाराज महंत आहेत. मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे यासाठी महंत सुनील महाराज यांनी प्रयत्न केले होते. संजय राठोड यांना एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणात मंत्रिपद सोडावे लागले होते. राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाजाला उभे करण्यासाठी सुनील महाराज यांनी पुढाकार घेतला होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुनील राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोड यांनी महंतांना भेट नाकारली होती. त्यानंतर सुनील महाराज आणि संजय राठोड यांच्या वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

आज पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. संपूर्ण राज्यात 1.5 ते 2 कोटी बंजारा समाजबांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत. कारण, शिवसेनाच बंजारा समाजाला न्याय देऊ शकते, सत्तेत वाटा देऊ शकते, असे सुनिल महाराज यांनी यावेळी बोलताना म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही सुनिल महाराजांचे स्वागत करताना नाव न घेता संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला. 

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा… असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी त्यांचं स्वागत करतो. बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. कारण, शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण, बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही, त्यामुळे हा समाज आमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच, दसऱ्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here