ज्यावेळी माझे 145 आमदार होतील, त्यावेळी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेन

0

अमरावती,दि.23: भाजप नेत्या पंकजा मुंडे या कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा भावाने केलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या विधानामुळे पंकजा मुंडे चर्चेत आल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करणार असल्याचं विधान केलं आहे. ‘तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नाही. गोपिनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानलं होतं, त्यामुळे पंकजा मुंडे माझ्या बहिण आहेत. ज्यावेळी माझे 145 आमदार होतील, त्यावेळी मी तिला मुख्यमंत्री करेन,’ असं महादेव जानकर म्हणाले आहेत.

दरम्यान मागच्या काही काळापासून भाजपचे मित्रपक्ष असलेले महादेव जानकर त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून आलं आहे. अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला होता. पक्षवाढीप्रमाणे भाजपची गुर्मी वाढली आहे, भाजप लवकरच गुंडाळून जाईल, अशी टीका जानकर यांनी भाजपवर केली होती.

सत्तेचा फायदा घेणारे अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, सामान्य माणूस शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत आहे. पवार आणि ठाकरेंना सहानुभूती आहे, असंही जानकर म्हणाले होते. मागच्या सरकारमध्ये केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी काही जण सत्तेत गेले. पांढरे कपडे घालून, चमचमीत गॉगल घालून गाड्यांमधून फिरणारे टगे एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत गेले, असा घणाघातही जानकरांनी केला होता.

ओबीसी मेळाव्याला गैरहजेरी

जालन्याच्या अंबडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांचे फोटो लावण्यात आले, पण त्या या मेळाव्याला उपस्थित राहिल्या नाहीत. पक्षाने दुसऱ्या नेत्यांना पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी तिथे गेले नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजांचा नवा चष्मा

दरम्यान पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नव्या चष्म्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. जवळचा नंबर असल्याने आता सगळं काही स्पष्ट दिसत आहे, आधी दूरचं स्पष्ट दिसत होतं, आता जवळचही दिसेल, कसा वाटला चष्मा? असा प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here