Clubhouse Chat प्रकरणी लखनऊच्या विद्यार्थ्याची चौकशी सुरू, हरियाणातून तीन आरोपींना अटक

0

नवी दिल्ली,दि.22: क्लबहाऊस चॅटवर (Clubhouse Chat) महिलांविरोधात द्वेष पसरवण्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस लखनऊच्या एका विद्यार्थ्याची चौकशी करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माहिती गोळा केली तेव्हा क्लब हाऊसच्या निर्मात्याबद्दल काही माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी लखनऊच्या विद्यार्थ्याची चौकशी सुरू केली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक टीम लखनौला पाठवण्यात आली आहे. येथे बिस्मिला नावाचा आयडी चालवणाऱ्या राहुल कपूर नावाच्या व्यक्तीचा माग काढण्यात आला. पोलिस चौकशीत त्याने कबूल केले आहे की सल्लोस नावाच्या युजरच्या सांगण्यावरून त्याने क्लबहाऊसमध्ये ऑडिओ चॅट रूम तयार केली आणि मॉडरेटरची जबाबदारी सल्लोसला (Sallos) दिली. पोलिसांनी राहुलचा मोबाईल जप्त केला असून तो आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत तपासात सामील होईल.
यापूर्वी मुंबईतील एका महिलेच्या तक्रारीवरून मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक विश्लेषणातून तीन आरोपींची ओळख पटली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. क्लब हाउस ॲपवर 2 ग्रुपचा मॉडरेटर असलेल्या आकाश सुयाल ऊर्फ किरा एक्सडी (19) याला कर्नाल येथून ताब्यात घेत त्याला 3 दिवसांची कोठड़ी मिळाली आहे. तो बारावी पास असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे तर, जैशनव कक्कड़ (21) आणि यश कुमार उर्फ यश पराशर (22) या दोघांना फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना ट्रांझिट रिमांडद्वारे ताब्यात घेतले आहे. कक्कड़ हा वाणिज्य शिक्षण घेत आहेत तर यश वकिलीचे शिक्षण घेत आहे. शेरसिंग का पापा, बाइकर गँग 5, pardhan@haryana-aala या नावाने ते क्लब हाउसवर प्रसिद्ध होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांंबे यांनी दिली. 

16 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान या ॲपवर दोन चॅट रूम तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये आकाश हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे, तर इतरांनी त्यात सहभाग घेतला आहे. तिन्ही आरोपींच्या चौकशीनंतर अधिक माहिती समोर येईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here