लखनऊ,दि.28: लखनऊमध्ये (Lucknow) एक मोठे फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या बनावट आयडीद्वारे बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. या टोळीतील दोन भामट्यांना विभूतीखंड पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक मृत लोकांच्या नावावर बँकांकडून कर्ज घेत असत. डीसीपी पूर्व प्राची सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचा नेता यापूर्वी विमा कंपन्यांमध्ये काम करत होता.
त्यांनी सांगितले की, कानपूर रोड येथील एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक अतुल भारती यांनी विभूतीखंड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. एका व्यक्तीने बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज मंजूर केल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर पोलिसांनी 2 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी एकाचे नाव मृगांक सहाय आणि दुसऱ्याचे नाव अभिषेक भारती आहे.
तपासानंतर रायबरेलीतील नौराना नगर येथील रहिवासी मृगांक सहाय आणि टेलिफोन नगर येथील रहिवासी अभिषेक भारती यांना अटक करण्यात आली. आरोपींनी आतापर्यंत 23 ते 24 बँकांकडून कर्ज घेतले असून, ते कोट्यवधींचे कर्ज मंजूर झाले आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी एचडीएफसी बँकेत एक कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. संशयास्पद आल्यानंतर बँकेने त्यांनी दिलेले आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे तपासली असता सर्व बनावट निघाले.
यानंतर विभूतीखंड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तपासात समोर आले आहे की, आरोपींनी कोरोनामुळे मृत व्यक्तींच्या बनावट आयडीवर त्यांचे फोटो चिकटवले होते. चौकशीत टोळीप्रमुख मृगांकने सांगितले की तो विमा एजंट म्हणून काम करत असे. त्याच्याकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा डेटा होता.
आरोपींनी मृताचे बँक खाते, सॅलरी स्लिप, आधार कार्ड आणि पॅनकार्डचा गैरवापर केला. मग एक योजना तयार केली, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.