मुंबई,दि.८: मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा थेट फटका आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसला असून, गॅस बुकिंगचे नियम कडक करण्यात आले आहेत. (LPG Booking Rules Change Amid Iran-Israel War)
काय आहे नवा २१ दिवसांचा नियम?
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (IOC, BPCL) वाढलेली गर्दी आणि ‘पॅनिक बुकिंग’ रोखण्यासाठी नवीन नियम लागू केला आहे. आता घरगुती गॅस ग्राहकांना एका सिलिंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर किमान २१ दिवस पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलिंडर बुक करता येणार नाही. गॅसचा साठा संपेल या भीतीने ग्राहक आगाऊ बुकिंग करत असल्याने वितरण व्यवस्थेवर ताण आला होता, तो कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
किंमतीत मोठी वाढ
नियमांमधील बदलासोबतच गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. घरगुती १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीसारख्या शहरात ८५३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ९१३ रुपयांवर पोहोचला आहे.
हा निर्णय का घ्यावा लागला?
१. पुरवठा साखळी खंडित: युद्धामुळे कच्च्या तेलाची आणि नैसर्गिक वायूची आयात विस्कळीत झाली आहे.
२. अचानक वाढलेली मागणी: युद्धामुळे गॅस मिळणार नाही, या भीतीने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू केले. कोलकाता आणि आसपासच्या भागात एकाच दिवसात १.५ लाखांहून अधिक बुकिंग झाल्याने कंपन्यांनी हा निर्बंध घातला.
३. समान वाटप: सर्वांना वेळेवर गॅस मिळावा आणि साठेबाजी रोखली जावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.








