मुंबई,दि.५: Loudspeaker Row: राज्यात सध्या लाऊडस्पीकर वरून वाद सुरु आहे. राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरुन मनसेनं आंदोलन पुकारलेलं असताना मुंबईतील मौलवींनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवी आणि धर्मगुरूंची बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत यापुढे पहाटेची अजान लाउडस्पीकर शिवाय केली जाईल असा ठराव संमत करण्यात आला. ‘सुन्नी बडी मशिदी’मध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. यात भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर न करता मशिदींमध्ये अजान केली जाईल असं बैठकीत ठरविण्यात आलं. या निर्णयाचं पालन करत मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत पहाटेची अजान आज लाऊडस्पीकर विना करण्यात आली आहे.