Lockdown Updates: महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ही माहिती

0

मुंबई,दि.7: Lockdown Updates: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Maharashtra) वाढत आहे. राज्यात ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांचीही संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown) लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. मुंबईत दररोज रुग्णांची संख्या वीस हजारापर्यंत गेल्यास लॉकडाऊन लावण्यात येईल असे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले होते.

मुंबईत दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचा किंवा जिल्हाअंतर्गत बंदीचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी स्पष्ट केले. लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या स्तरावरील विचारविनिमयानंतर कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona 3rd Wave) पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री टोपे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वाढती रुग्णसंख्या, लसीकरणासह विविध उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, बुधवारी कोरोनाच्या 25 हजार केसेस सापडल्या. उद्या कदाचित 35 हजार केस असू शकतील. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. सध्या घातलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करा. अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्यासाठी काही अधिक निर्बंध वाढवायची गरज भासली तर तेही घालावेत, अशा प्रकारची चर्चा करून शरद पवार यांनी आढावा घेतला.

मुंबई, पुणे, ठाण्यातील शाळा व काॅलेजही  बंद केली आहेत. पण शाळा-काॅलेज बंद केल्यानंतर या वयोगटातील तरुण-तरुणी माॅल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी करू लागले तर उद्देश साध्य होणार नाही याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. लसीकरण, औषधे, निर्बंधांवर चर्चा झाली. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमधील संख्येच्या मर्यादेची कठोरपणे अंमलबजावणी  करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

रात्रीची संचारबंदी व वीक एंड लॉकडाऊनच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर टोपे म्हणाले की, या सर्वांच्या संदर्भात चर्चा झाली, पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. सर्व यंत्रणांसह संबंधित घटकांशी चर्चा करूनच असे निर्णय घेतले जातात, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here