नाशिक,दि.८: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, पुन्हा काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी होत असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या असून मंदिरे खुली करण्यात आली आहेत. मात्र, त्याच दरम्यान अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचं दिसून येत आहे. अहमदनगरमधील 60 हून अधिक गावांत लॉकडाऊन लावण्यात आला असताना आता नाशकातून चिंता वाढवणारी बातमी आली आहे. नाशिकमधील तीन तालुक्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जर या तालुक्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत अशीच वाढ सुरू राहिली तर कठोर निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यात कोरोना बाधिताांची संख्या वाढली असून चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. काही ठिकाणचे मार्केट्स सुद्धा आपल्याला बंद करावे लागतील. तशी परिस्थिती येऊ नये यासाठी या तिन्ही तालुक्यांत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या तालुक्ंयातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर जर कमी झाला नाही तर कठोर निर्बंध लावावे लागतील.
निर्बंध शिथिल झाल्याने इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेजारील जिल्ह्यातील 68 गावे लॉकडाऊन केले आहेत. तिथल्या नागरिकांचे येणं-जाणं किंवा तेथील रुग्णालयात आपल्या नागरिकांनी जाणं किंवा इतर कामासाठी जाणं यातूनही निश्चित परिणाम होत असल्याचं दिसत आहे असंही छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
60 हुन अधिक गावात लॉकडाऊन
राज्यातील कोरोना कमी होत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये मात्र करुणा रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. वाढत असलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहमदनगर जिल्ह्यातील 60 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. एका नवीन कोरोना रुग्णाच्या संपर्कातील तीस जणांची चाचणी केली जात असून आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.