सोलापूर,दि.२५: लिंगायत महामोर्चा | लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी येत्या रविवारी दि. २९ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये धर्मगुरुसह लिंगायत समाजातील नेते मंडळी सहभाग होणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील दहा हजार लिंगायत समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच या राज्यव्यापी मोर्चामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत राज्यव्यापी लिंगायत धर्मियांच्या खालील प्रमुख मागण्या करीता महामोर्चा निघणार आहे.
या आहेत मागण्या | लिंगायत महामोर्चा
१) लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी.
२) राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करावे.
३) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे.
४) मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावे.
५) महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
६) गांव तेथे रुद्रभुमी ( स्मशानभुमी) व गांव तेथे अनुभव मंटप ( सभामंडप ) करण्यात यावे.
७) लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे.
८) राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावे. तसेच वीरशैव लिंगायत व हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्यांचा ओबीसी घटकामध्ये समावेश नाही, त्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सरकारी नोकरीची संधी मिळत नाही. सरकारने शुध्दीपत्रक काढून ओबीसी मध्ये समावेश करावे.
या मागण्या सरकारकडे मान्य करण्याकरिता या राज्यव्यापी लिंगायत महामोर्चामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन विजयकुमार हत्तुरे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस लिंगायत समन्वय समितीचे शहर समन्वयक सकलेश बाभुळगांवकर, जिल्हा समन्वयक – नामदेव फुलारी, नागेश पडणुरे, सिध्दाराम कटारे, श्रीशैल शेट्टी, राजकुमार व्हनकोरे आदी उपस्थित होते.