समीर वानखेडेंची नोकरी जातेय की मलिकांचे मंत्रीपद जातेय ते पाहूया : रामदास आठवले

0

सातारा,दि.२४: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अजून न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यन खानला अजून जामीन मिळालेला नाही. ड्रग्ज प्रकरणात चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेची NCB ने चौकशी सुरू केली आहे. मुंबईवरून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. समीर वानखेडे यांची एका वर्षात नोकरी घालवणार,असा इशारा नवाब मलिक यांनी दिला होता. नवाब मलिकांच्या या विधानावर आता केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी एक खोचक टोला लगावला आहे.

‘आरोप होतायंत मात्र पूर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात एनसीबीकडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही. सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणणे योग्य ठरणार नाही. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जातेय,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

‘मनसेला सोबत घेतल्यामुळं भाजपला मोठं नुकसान होणार आहे. आमच्याशी युती केली तर त्यांचा महापौर आणि आमचा उपमहापौर होऊ शकतो,’ असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here