सोलापूर,दि.२५: Leh Ladakh Protest: नेपाळमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात झाला. आता भारतातही आंदोलन सुरु करण्यात आले आहे. लेहमध्ये राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार उसळला, त्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० जण जखमी झाले. चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले. दंगलखोरांनी भाजप कार्यालय आणि लेह स्वायत्त विकास परिषदेच्या कार्यालयाची तोडफोड आणि आग लावली. जवळपास एक डझन वाहनांचेही नुकसान झाले.
स्वतंत्र राज्याच्या दर्जासाठी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी भडका उडाला. रोजगार आणि लोकशाहीसाठी लडाखची राजधानी लेहमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. यादरम्यान हिंसाचार भडकला. लेहमधील भाजपाचे कार्यालय जाळून टाकले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व अश्रूधुराचा मारा केला. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत 4 जणांचा मृत्यू झाला, तर 70 जखमी झाले. (Leh Ladakh Protest News)
दंगलखोरांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि गोळीबार केल्याचे वृत्त आहे. संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हिंसाचारानंतर, उपोषण करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण संपवण्याची घोषणा केली.
दरम्यान, गृहमंत्रालयाने लेहमधील हिंसक निदर्शनांसाठी सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. केंद्राने म्हटले आहे की कार्यकर्त्याने त्यांच्या प्रक्षोभक विधानांनी जमावाला भडकावले. सरकारने सांगितले की लेहमधील परिस्थिती दुपारी ४ वाजेपर्यंत नियंत्रणात होती.
दरम्यान, प्रशासनाने काँग्रेस नेते आणि नगरसेवक फुंटसोग स्टॅनझिन सेपाग यांच्याविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी काँग्रेस नेत्याने केलेल्या भाषणामुळे या प्रदेशात अशांतता निर्माण झाली, असा आरोप आहे. परिस्थिती पाहता, दोन दिवसांचा लडाख वार्षिक महोत्सव रद्द करण्यात आला आहे.
आंदोलन कशासाठी? | Leh Ladakh Protest
स्वतंत्र राज्याच्या दर्जासह विविध मागण्यांसाठी केंद्रशासित लडाखमधील पर्यावरणवादी सोनम वांगचुक व लेह ऍपेक्स बॉडी (लॅब) या संघटनेचे नेते उपोषणाला बसले आहेत. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तरुणांमध्ये अस्वस्थता होती. या अस्वस्थतेतून ‘लॅब’ने आंदोलनाची हाक दिली. त्यास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतप्त तरुणांनी भाजप कार्यालय, पोलिसांना लक्ष्य करत तुफान दगडफेक व जाळपोळ केली.
१० सप्टेंबरपासून उपोषण
सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील एक गट १० सप्टेंबरपासून उपोषणावर आहे हे उल्लेखनीय आहे. दररोज ५०० लोक यात सहभागी होतात. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी लडाखच्या लेह आणि कारगिल जिल्ह्यातील शिष्टमंडळांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते, परंतु बुधवारी हिंसाचार उफाळला. मंगळवारी, उपोषण करत असलेले ७२ वर्षीय त्सेरिंग अंगचुक आणि ६२ वर्षीय ताशी डोल्मा आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपोषणस्थळी असलेल्या काही नेत्यांनी नंतर प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप आहे आणि लेहमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लेह ॲपेक्स बॉडीच्या (LAB) युवा शाखेने बंदची हाक दिली. बुधवारी सकाळी, एका गटाने उपोषणस्थळावरून घोषणाबाजी करत मोर्चा काढला आणि लवकरच निषेधाला हिंसक वळण लागले.








