सातारा,दि.२३: Laxman Mane On Sharad Pawar: लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबाबत मोठं विधान केले आहे. देशात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागरिकांची मुस्कटदाबी सुरू केली आहे. भविष्यात हुकुमशाही आणण्याचा त्याचा प्रयत्न असून त्यांच्याबद्दल बोलणारांविरोधात केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. अजित पवार समर्थकांसह भाजप सरकारमध्ये सहभागी झाले असले, तरी शरद पवार राजकारण सोडतील, पण भाजपमध्ये अजिबात जाणार नाहीत, असे स्पष्ट मत भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष, उपराकार लक्ष्मण माने यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
राज्यात झालेले सत्तानाट्य हे भाजपचे यश नसून केंद्रीय यंत्रणांचे यश आहे. या यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडाफोडीचे काम सुरू असून हे लोकशाहीसाठी घातक आहे. माझ्यावर कोणतीही कारवाई करा, मी घाबरणार नसून चुकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे. मी साहित्यिक असून मला सत्य बोलले पाहिजे. राज्यातील सर्व साहित्यिकांनी सत्य बोलून मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला पाहिजे. भाजप सोडून कोणालाही मत द्या, असे आवाहन करत भाजपविरोधी पक्ष व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन माने यांनी केले.
शरद पवार एकवेळ राजकारण सोडतील पण… | Laxman Mane On Sharad Pawar
ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे राजकारण सोडतील पण भाजपबरोबर जाणार नाहीत. भाजपला देशात हुकुमशाही आणायची असून भाजपविरोधी सर्व पक्ष, संघटनांनी एकत्रित यावे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भटक्या विमुक्त जमाती संघटनेचा पाठिंबा असून शरद पवार हेच आमचे नेते आहेत.
भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाला प्रश्न सुटावेत असे वाटत नाही. स्वातंत्र्याला ७५ वर्षे होवूनही देखील या उपेक्षित समाजाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे ३७ वर्षानंतर पुन्हा भटक्या विमुक्तांच्या वाड्यावस्त्यावर जावून शोधयात्रा काढावी लागत आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीबरोबर संघटना काम करणार आहे. आघाडीकडे लोकसभेची एक आणि विधानसभेच्या सहा जागा मागणार असल्याचे लक्ष्मण माने म्हणाले.