अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्याघरी BJP ची बैठक

0

मुंबई,दि.१७: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याघरी रात्री उशिरा BJP ची बैठक झाली. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीवर राजकीय दबाव वाढत आहे. रविवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेलं आवाहन तसेच शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेलं पत्र या दिवसभरातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अंधेरीमधील पोटनिवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये निवडणूक लढवली पाहिजे असा नेत्यांचा सूर असल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे. तर या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा असं निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळेच आज निवडणूक अर्ज मागे घेण्यासंदर्भात भाजपा काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपा ही निवडणूक लढणार की बिनविरोध होणार हे आज निश्चित होणार आहे.

रात्री दीड दीड तास भाजपा नेत्यांची फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाचा नेते निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत असल्याचं या बैठकीमध्ये दिसून आलं. मात्र या निवडणुकीबद्दलचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. भाजपा ही जागा लढवू शकते असं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटी तारीख आहे त्यामुळे आता फडणवीस आणि भाजपाचे केंद्रीय नेते याबद्दल काय निर्णय घेतात. हे पाहणं महत्त्वाचं आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजपाने सावध भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते.

अंधेरीत शिवसेनेचा विजय झाल्यास त्याचा आगामी मुंबई पालिका निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. शिवसेनेचे नैतिक बळ तर वाढेलच पण मतदारांमध्ये शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते. भाजपाले हे टाळायचे आहे. अंधेरीत यशाबद्दल भाजपाचे नेते साशंकच आहेत. यामुळेच अंधेरीबाबत भाजपामध्ये वेगळा मतप्रवाह असल्याचे समजते.

राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठविले असले तरी आता शेवटच्या क्षणी काही भूमिका घ्यायची असेल तर एकटय़ाला निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी पक्षात चर्चा करावी लागणार आहे, वरिष्ठांशी बोलावे लागणार आहे. आमच्याबरोबर बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चेअंती घेतला जाईल असेही फडणवीस यांनी रविवारीच स्पष्ट केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here