Lata Mangeshkar: हेमांगी कवीनं सांगितलं लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला मराठी कलाकार का नव्हते

0

मुंबई,दि.7: सर्वांच्या लाडक्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) जवळपास महिनाभरापासून आजारी होत्या. त्यांच्यावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शाहरुख खान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिवाजी पार्कवरील अत्यंसस्काराला एकही मराठी कलाकार उपस्थित नसल्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार कुठे गेले होते, असा सवाल त्यांना विचारला जातआहे. सोशल मीडियावर उपस्थित झालेल्या या प्रश्नाला आणि मराठी कलाकारांवर होत असलेल्या टीकेला अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने सडेतोड उत्तर देत खरी परिस्थिती काय होती हे सांगितले आहे.

दादर, शिवाजी पार्क येथे भारतरत्न लता मंगेशकर यांना साश्रुनयांनी निरोप देण्यात आला. यावेळी बॉलिवूडमधील शाहरुख खान, आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. त्यावेळी मराठी कलाकार कुठे गेले होते, असा प्रश्न सोशल मीडियावर काही युझर्सनी विचारला. त्याला अनेकांनी अनुमोदन देत मराठी कलाकांवर टीका करायला सुरुवातकेली. युझर्सन विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्री हेमांगी कवीने दिले आहे. तिने सांगितले की, ‘सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिले नाही.

खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप मी आणि अभिजीत केळकर चार वाजल्यापासून तिथे होतो. शेवटपर्यंत आम्हांला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हते. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकले जात होते, तिथे माझी काय गत! आम्ही तिथे कुणी सेलिब्रेटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो…’

हेमांगीने तिच्या या कॉमेन्टमध्ये पुढे नमूद केले आहे की, आम्हांला ही सरकारी प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितले वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचे दर्शन घेतले! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आले नसावे.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here