दि.६: Pakistan Tribute To Lata Mangeshkar: सर्वांच्या लाडक्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) जवळपास महिनाभरापासून आजारी होत्या. 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया झाला होता. लता दीदींचे वय पाहता डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. तेव्हापासून त्या सतत संघर्ष करत होत्या.
भारतासह अनेक देशातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्या निधनामुळे भारतासह पाकिस्तानही हळहळला आहे. पाकिस्तानातील प्रमुख आणि मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी, विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ओह इंडिया
ट्विटर यूजर ‘Zaidu’हे एक विडंबन करणारे अकाउंट आहे. हे अकाउंट पाकिस्तानी सैन्याचेप्रमुख जनरल कमर बाजवा यांचे वैयक्तिक सल्लागार असल्याचा दावा करते. या अकाउंटवरूनही भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ओह इंडिया… तुम्ही आज काय गमावले आहे, याची तुम्हाला कल्पना ही. १००० पाकिस्तान जन्माला आले तरी एवढी मोठी हानी भरून काढता येणं अशक्य आहे. लतादीदींच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती!… असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मंत्री फवाद यांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
‘महान व्यक्तिमत्व हरपले. लता मंगेशकर यांनी संगीत विश्वावर अनेक दशके राज्य केले. लतादीदी सुरांची राणी होत्या. संगीत विश्वात त्यांच्यासारखा कोणीच नव्हता. त्यांचा आवाज येणाऱ्या काळातही नागरिकांच्या हृदयावर अधिराज्य करत राहणार, असे मंत्री फवाद यांनी म्हटले.
नेपाळच्या राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
नेपाळच्या राष्ट्रपती बिदिया देवी भंडारी यांनीही नेपाळच्या जनतेच्यावतीने लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अनेक नेपाळी गाण्यांना आपल्या मधुर आवाजाने सजवणाऱ्या प्रसिद्ध भारतीय गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. विलक्षण प्रतिभा असलेल्या स्वर्गीय लता मंगेशकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, असं नेपाळच्या राष्ट्रपती म्हणाल्या.