अहमदाबाद,दि.11: काही दिवसांपूर्वी डीआरआयने (Directorate of Revenue Intelligence) गुजरातच्या मुंद्रा येथून दोन कंटेनरमधून 2 हजार 922.22 किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती आणि त्यासोबतच काही अफगाणिस्तानी नागरिकांचीही चौकशी केली जात होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या हेरॉईनच्या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त (drugs seized in Gujarat) करण्यात आला आहे. गुजरात पोलिसानी ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ही 300 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील द्वारका (Dwarka Gujarat) जिल्ह्यातील खंभालिया येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो ठाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानामधून हे ड्रग्ज सागरीमार्गे भारतात आणले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 44 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सज्जाद असे असून तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
राजकोट क्षेत्राचे पोली उपमहानिरीक्षक (डीआयजी) संदीप सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी सज्जाद याला अंमली पदार्थांच्या साठ्यासह अटक केली आहे. त्याच्याकडून हेरॉईन आणि मेथामेफटामाइन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईनंतर बुधवारी पोलिसांनी देवभूमी द्वारका जिल्ह्यातून आणखी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सज्जाद याला अटक केली. त्याच्याकडील बॅगमधून 19 पॅकेट्स जप्त करण्यात आली आहे. तक्यामध्ये 11.483 किलोग्रॅम हेरॉईन आणि 6.168 किलोग्रॅम मेथामेफटामाइन आढळून आले आहे. तर इतर दोघांकडून 17.65 किलोग्रॅम अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सज्जाद हा ठाण्यातील मुंब्रा परिसरातील भाजी विक्रेता असून तो तीन दिवसांपूर्वी अंमली पदार्थांचा साठा घेण्यासाठी येथे आला होता असंही पोलिसांनी सांगितले.
या कारवाईनंतर आम्ही इतर ठिकाणी छापेमारी केली. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अशाच प्रकारचे 47 पाकिटे आढळून आली. ही सुद्धा सर्व पाकिटे आम्ही जप्त केलेली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे असंही पोलिसांनी सांगितले.