मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन प्रस्ताव आल्यानंतर भूसंपादन

0

बाधित शेतकऱ्यांची मते जाणून घेणार : जिल्हाधिकारी

सोलापूर,दि.१ : मुंबई – हैदराबाद ही बुलेट ट्रेन सोलापूरमार्गे सुरू करण्याचे नियोजित असून याबाबत सर्व्हे झाला आहे. पुढील पंधरा दिवसानंतर बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून याविषयीची त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. भूसंपादनाबाबत हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ त्याचे काम पूर्ण करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली उभारणीनंतर बुलेट ट्रेनच्या उभारणीनंतर होणाऱ्या पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करण्यासाठी जनसुनावणी झाली. यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, प्रांताधिकारी हेमंत निकम, भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक हेमंत सानप, अपर्णा कांबळे, कल्याण जाधव आदी उपस्थित होते.

मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेनचा एकूण ६४९.७६ किलोमीटर मार्ग असणार आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून १७० किलोमीटर मार्ग जाणार आहे. त्यासाठी माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यातील ६२ गावांतून ही बुलेट ट्रेन जाणार आहे. त्यासाठी ३१७.९७ हेक्टर जमिनीचे संपादन खासगी वाटाघाटी किंवा नव्या भूसंपादन कायद्यानुसार होईल.

सद्यःस्थितीत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून त्यासाठीचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. तो पूर्ण होण्यास साधारणत: दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. हायस्पीड रेलकडून भूसंपादनाचा प्रस्ताव आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे भूसंपादन विभागाच्या समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here