मुंबई,दि.17: Lalit Modi On Mukul Rohatagi: मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांमध्ये अडकलेल्या आयपीएलची सुरुवात करणाऱ्या ललित मोदींनी (Lalit Modi) ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohatagi) यांना खुली धमकी दिली होती. रोहतगी यांना इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून धमकी दिली. मला फरार म्हणू नका. तुमच्यासारख्या लोकांना लाखोवेळा खरेदी करून विकू शकतो. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात, अशी धमकीच ललित मोदी यांनी दिली होती. मोदी यांच्या या पोस्टमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. असे असतानाच आता मोदी यांनी इन्स्टाग्रामार्फतच मुकुल रोहतगी यांची माफी मागितली आहे. मी रागाच्या भरात बोलून गेलो. मी माफी मागतो, असे ललित मोदी म्हणाले आहेत.
काय म्हणाले ललित मोदी? | Lalit Modi On Mukul Rohatagi
“इन्स्टाग्रामवरील माझ्या पोस्टसंदर्भात मी पुन्हा एकदा विचार केला. मी रागाच्या भरात बोलून गेलो. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. माझ्या आईकडून मला आर्थिक संकटात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या डावपेचांमुळे मी निराश झालेलो आहे. सॅमी आणि माझ्याकडे काही शेअर्स होते. त्याच शेअर्सच्या माध्यमातून आम्ही एका ट्रस्टमध्ये गुंतवणूक केली. हाच ट्रस्ट आता माझ्या आईने बळकावला आहे. माझ्या आईच्या वागण्यामुळे मला तसेच माझ्या परिवाराला खूप त्रास होतोय. त्याचा परिणाम माझ्या मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यावर झाला आहे. याच कारणामुळे मी हे सर्व सोडून सर्व अधिकार माझा मुलगा रुचीरकडे दिले आहेत,” असे ललित मोदी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

धमकी देण्याचे सांगितले कारण | Lalit Modi
ललित मोदी यांनी मुकूल रोहतगी यांना धमकी देण्यामागचे कारणही सांगितले आहे. “मला तुमचा निषेध नोंदवायचा होता. मला फरार म्हटले जाते. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात असताना तुम्ही सहमती दर्शवली. मात्र मी न्यायाधीशांना खरेदी करणे तसेच विकणे याबाबतचे भाष्य करायला नको होते,” असेही ललित मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय दिली होती धमकी?
ललित मोदी यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना धमकी दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये “रातोरात्त न्यायाधीशांना विकत घेऊन तुमच्या अशिलाला न्याय देत असाल. परंतु, मी तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो. तुम्ही तुमच्या अशिलासाठी कितीही लढू शकता, पण माझा उल्लेख ‘मिस्टर मोदी’च कराल. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात. मात्र, तुमचं नशीब आहे, मला मुंग्या आवडतात. त्यामुळे मी तुम्हाला चिरडणार नाही. पण, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांत तुम्ही माझ्याबद्दल काही बोलल्याचं कळलं, तर मी तुमच्या मागोमाग न्यायालयात येणार. जय हिंद,” अशी धमकी ललित मोदी यांनी दिली होती.