किशोरी पेडणेकर एकनाथ शिंदे गटात सामील होणार? स्वतः दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.२९: शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याची चर्चा सुरू होती. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांनी शुक्रवारी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘एसआरए’ घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. यानंतर आता किशोरी पेडणेकरांना शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोरी पेडणेकरांना फोन केल्याची माहितीही समोर आली होती.

या सर्व घडामोडींवर किशोरी पेडणेकरांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला नाही, अशी माहिती पेडणेकरांनी दिली. एकनाथ शिंदे तेवढे समजूतदार व्यक्ती आहेत. त्यांनी मला कधीही फोन केला नाही किंवा शिंदे गटात सामील होण्यासाठी मला कोणाकडूनही फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

‘एसआरए’ घोटाळ्याबाबत आरोप करून तुम्हालाही संजय राऊतांप्रमाणे तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असं विचारलं असता पेडणेकर म्हणाल्या, “माझा संविधानावर, पोलीस यंत्रणांवर आणि न्यायालयावर विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी मला खात्री आहे. पण ‘आग लागली की धूर निघतो’ ही म्हण भाजपानं बदलली आहे. ते नुसता धूर काढत आहेत. मुळात आग लागलेलीच नाही.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here