मुंबई,दि.१८: भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान दिले आहे. (Kirit Somaiya’s challenge to Sanjay Raut) आयएनएस विक्रांत निधी अपहार आणि शौचालय घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिलं आहे.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केले होते आरोप
संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या कुटुंबावर दोन्ही घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नगरसेवक शिंदे गटात जाणार?
राऊतांच्या घरात भूकंप येईल
“क्लीन चिटबद्दल ऐकलं तर संजय राऊतांच्या घरात भूकंप येईल. सोमय्या कुटुंबाने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा करत घाण केल्याचं ते म्हणत होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण कोणी केली?,” अशी विचारणा करत सोमय्यांनी कागदपत्रं दाखवली. तसंच संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचा व्हिडीओही दाखवला.
राजेश नार्वेकर कोण आहेत हे सांगावं
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मातोश्रीत बैठक घेतली होती. या बैठकीत मीरा भाईंदरचे आयुक्त, पोलीस अधिकारी मधुकर पांडे, पर्यावरण सचिव मनिषा म्हैसकर, याशिवाय तर अधिकारी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजेश नार्वेकर कोण आहेत हे सांगावं. तसंच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन लक्ष ठेवलं जात होतं की नाही हे सांगावं,” असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं.”संजय राऊतांकडे घोटाळ्याची कागदपत्रं कशी आली? राजेश नार्वेकर यांनी दिली की उद्धव ठाकरेंनी,” असा प्रश्नही यावेळी त्यांनी विचारला.
“ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तुमच्यावर फौजदारी कारवाईला सुरुवात करत असल्याची नोटीस दिली होती. ते ठाणे जिल्ह्यातील पर्यावरण विभागाच्या मॉनिरटिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत. महत्त्वाचं म्हणजे ते संजय राऊतांचे व्याही आहेत. संजय राऊत ज्या मुलीच्या लग्नात किती खर्च झाला यासाठी डेकोरेटवर दबाव आणला म्हणून बोंबलत होते, त्या मुलीचे ते सासरे आहेत. त्यांनीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
कायदेशीर नोटीस दिल्यानंतर क्लीन चिट
“किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि युवा प्रतिष्ठान निर्दोष असल्याची सर्व कागदपत्रं त्यांच्याकडे होती. आम्ही कायदेशीर नोटीस दिल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी क्लीन चिट दिली. संजय राऊतजी तुमच्या व्याहींनी क्लीन चिट दिली आहे. आता संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर राजेश नार्वेकरांवर आरोप करावेत. राजेश नार्वेकर विकले गेलेत म्हणावं. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठका घेतल्या की नाहीत हे सांगावं. राजेश नार्वेकर यांनी विश्वासघात केला, खोटा रिपोर्ट दिला हे सांगावं. हे क्लीन चिट खरं आहे की खोटं याची माहिती त्यांनी द्यावी,” असं आव्हानच सोमय्यांनी दिलं आहे.
सोमय्या यांच्यावर काय होते आरोप?
किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. “मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाला आहे. म्हणजे ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत,” असा टोला राऊत यांनी लगावला होता.
काय म्हणाले होते संजय राऊत?
किरीट सोमय्या व त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळय़ाची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरे म्हणजे यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात राग आहे. शरद पवारांवर त्यांनी ट्विटवर ट्विट केले. एखादे ट्विट आयएनएस विक्रांत घोटाळय़ावर करायला हवे. एखादे ट्विट त्यांनी या शौचालय घोटाळय़ावर करावे, असे राऊत म्हणाले होते.