मुंबई,दि.२५: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी नवघर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, नवघर पोलिसांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात रविवारी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.
सोमय्या यांच्या संदर्भातील अश्लील आणि आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल मराठी वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना आता सोमय्या यांनाच खंडणीसाठी ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. नवघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून सायबर पोलीसही याबाबत समांतर तपास करत आहे.