किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील बेपत्ता, राष्ट्रवादीने अमित शाहांवर साधला निशाणा

0

मुंबई,दि.१२: भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर सोमय्या यांना कधीही अटक होऊ शकते. ‘आयएनएस विक्रांत’साठी निधी जमा करून त्याचा अपहार केल्याच्या आरोपप्रकरणी सत्र न्यायालयाने सोमवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. ‘विक्रांत’ला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सोमय्या यांनी निधी गोळा केल्याचे, परंतु ते राज्यपालांच्या कार्यालयात जमा केले नसल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सोमय्या यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

दरम्यान या प्रकरणाची सुनावणी सुरु होण्याआधीच किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील हे बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सोमय्या पिता-पुत्र बेपत्ता होण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिली प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विटवरुन सोमय्या बेपत्ता होण्यासंदर्भात भूमिका मांडताना एक प्रश्न उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्रालयावर निशाणा साधलाय. “किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे. पण ‘झेड प्लस’ सीआयएसएफ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती निश्चितपणे असेल,” असं या प्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, “जर किरीट सोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यकता असेल तेव्हा माहिती देणे हे केंद्रीय गृहमंत्रालयाचं कर्तव्य आहे,” असंही क्रास्टो यांनी म्हटलं आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने सोमय्या यांना सप्टेंबर महिन्यामध्ये झेड प्लस सुरक्षा दिली आहे. सीआयएसएफचे ४० जवान सोमय्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. एवढी मोठी सुरक्षा घेऊन फिरणारे सोमय्या बेपत्ता कसे होऊ शकतात असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केलाय. तसेच सोमय्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले जवान नेमके कुठे आहेत याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला असणारच असं म्हणत राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे सोमय्या लपून बसण्यामागे त्यांना भाजपाच्या बड्या नेत्यांचं आणि सरकारी यंत्रणांचं समर्थन आहे का असा प्रत्यक्ष सवाल उपस्थित केलाय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here