माजी क्रिकेटपटू तसेच मनसे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

0

मुंबई,दि.८: काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांमुळे महाराष्ट्राच्या विकासात बाधा येत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी बावनकुळे बोलत होते.

ओबीसी कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, खा. अशोक चव्हाण, आ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस संदीप गिड्डे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. 

यावेळी सातारा, कराड, हिंगोली, नांदेड, वसमत येथील काँग्रेस, सांगली येथून मनसे, कॉंग्रेस आणि शिवसेनेतील (ठाकरे गट)  कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला. बावनकुळे आणि चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन माजी क्रिकेटपटू तसेच सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व केदार जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपासाठी केदार यांचा पक्षप्रवेश हा आनंदाचा क्षण आहे त्यांच्याकडील सांघिक भावना, कौशल्य पक्षाला ताकद देईल असेही त्यांनी नमूद केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here