ठाणे,दि.3: शिवसेनेचे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इशारा दिला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, तर शिवसैनिकांसह तुमच्या घरावर मोर्चा काढावा लागेल, असं ते म्हणाले.
केदार दिघे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, ”हा शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे. ठाणे हा शिवसेनेचा, दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे. जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल”
केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं 28 जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर यानं धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
तसेच पीडित तरुणीने याबाबत तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावलं आहे, असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यासह केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.