मुंबई,दि.27: केदार दिघे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 62 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. गावाखेड्यातील शिवसैनिक सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहे. तर, राजकीय पक्षाचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीसमोर झुकणार नाही, हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मराठी बाणा जपणारे, तमाम सामान्य जनतेची कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेणारे महाराष्ट्राचे लोकनायक, आदर्श राजकारणाचे मूर्तीमंत व्यक्तिमत्व उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.
आमचं हिंदुत्व हे मुखात राम आणि हाताला काम असं आहे. निवडणुकीसाठी काहीजण हिंदुत्व वापरतात, तसं आमचं हिंदुत्व नाही…आमचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. बाळासाहेबांची हिच शिकवण आहे..दिघेसाहेबांची हीच भूमिका आहे, असं केदार दिघे यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.