Kedar Dighe: एकनाथ शिंदे यांच्या बाबत केदार दिघे म्हणाले आनंद दिघे साहेब असते तर–

0

मुंबई,दि.21: Kedar Dighe On Eknath Shinde: आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. एकनाथ शिंदे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी भाजपा बरोबर राज्यात सरकार स्थापन करावे अशी मागणी केली आहे. भाजपा बरोबर सरकार स्थापन केल्यास आपण शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीसोबत कोणताही ताळमेळ नाही, आमदार आणि मंत्र्यांचीही तीच भूमिका आहे. पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, त्यामुळे भाजपसोबत युती करणं हिच काळाची गरज आहे. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने सत्तापालटाच्या चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यासोबत पक्षाचे नेतेही पोहोचण्यास सुरुवात झाली. आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेही शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

“एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते, तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे 100 टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.

“गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही, तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला, तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल,” असं केदार दिघे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये आनंद दिघे यांचा उल्लेख केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, “हे ट्वीट करण्याअगोदर मीडियामध्ये त्यांनी ऑफर पाठवल्याची चर्चा होती. भाजपाकडे जाऊन उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी त्यांची मागणी होती. ही बातमी खरी असेल तर दिघे साहेबांच्या विचाराबाबत कोणी बोलू नये. कारण आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला आणि भारताला दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं होतं हे माहिती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते भगव्याप्रतीच निष्ठावंत राहिले. त्यामुळे याचा आधार घेत कोणी आपली भूमिका मांडू नये”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here