मुंबई,दि.30: धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या या विधानावर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी टीका केली आहे.
आनंद दिघेंबाबत जे घडलं ते माहित होतं तर मग इतके वर्ष गप्प का होता? असा सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. केदार दिघे यांनी ट्विटच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?”, असं ट्विट केदार दिघे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तुम्ही आमचे आई-बाप का काढता?, सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला?, असा सवाल उपस्थित करत मलाही आता भूकंप करावा लागेल, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर देखील भाष्य करणार असल्याचं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत. यावेळी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावं लागेल, असा इशारा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.