बेंगळुरू,दि.16: Karnataka MLA Munirathna’s Arrest: कोलारमध्ये कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कर्नाटकचे भाजपा आमदार मुनीरत्ना यांना शनिवारी अटक करण्यात आली. मुनीरथना हे बेंगळुरूमधील राजराजेश्वरी नगरचे आमदार आहेत. कॉन्ट्रॅक्टर चेल्वराजू यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की भाजप नेत्याने आपल्याला त्रास दिला आणि धमकावले.
आमदाराविरुद्ध दोन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात मुनीरत्ना आणि त्याचे चार सहकारी, ज्यात त्यांचा सहकारी व्हीजी कुमार, त्यांचे सुरक्षा अधिकारी अभिषेक आणि वसंत कुमार यांचा समावेश आहे. सर्वांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. दुसऱ्या प्रकरणात मुनीरत्ना यांनी कंत्राटदाराविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
दोन दिवसांची कोठडीत रवानगी
भाजपा आमदार मुनीरत्ना यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सुरुवातीला एका आठवड्याच्या कोठडीची विनंती केली होती, मात्र सुनावणीनंतर न्यायमूर्ती संतोष गजानन भट्ट यांनी केवळ दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. कोलारजवळ अटक केल्यानंतर काल रात्री मुनीरत्ना यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले.