बेंगळुरू,दि.30: सध्या कर्नाटकात गणेश चतुर्थीची पूजा ईदगाह मैदानावर आयोजित करण्यावरून वाद सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकीकडे गणेश चतुर्थीच्या पूजेची तयारी जोरात सुरू झाली आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी यथास्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे.
बेंगळुरूमधील चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. कर्नाटक वक्फ बोर्डाने ही जागा आपली मालमत्ता असल्याचे सांगत म्हटले की, वर्षानुवर्षे येथे ईदची नमाज अदा केली जाते. आज यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जमिनीवर यथास्थिती ठेवण्याचे आदेश देत हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाकडे परत पाठवले आहे.
तत्पूर्वी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने मैदानात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु खंडपीठाने सरकारला पूजेसाठी परवानगी मागणाऱ्या लोकांच्या अर्जांवर विचार करण्यास सांगितले होते. यानंतर राज्य सरकारने 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पूजेला परवानगी दिली होती. मात्र आता पुन्हा यासंबंधित परवानगी नाकारण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात वक्फ बोर्ड काय म्हणाले?
वक्फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी अनेक जुन्या प्रकरणांच्या आधारे ईदगाहमध्ये गणेश चतुर्थीची पूजेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने आपले म्हणणे मांडताना सांगितले की, तुमच्या याचिकेवरून तुम्ही जमिनीच्या मालकी हक्काबाबत याचिका दाखल केल्याचे दिसते. कारण या जागेचा वापर स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी करता येईल, असा आदेश उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता. यावर सिब्बल म्हणाले की, आजही आमचा यावर कोणताही आक्षेप नाही. मुले आधीच खेळाचे मैदान म्हणून वापरत आहेत. परंतु या मैदानाचा इतर धार्मिक कार्यांसाठी (पूजेसाठी) वापर करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.