सोलापूर,दि.५ः सोलापूर महापालिका निवडणूक मतदान १५ जानेवारीला होणार आहे तर मतमोजणी १६ जानेवारीला होणार आहे. मात्र प्रभाग क्रमांक २६ मधील गणेश बिल्डर्स स्किम नं ३, अमोल नगर तसेच लोखंडवाला पार्क येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे. गेली ३३ वर्षे झाली अमोल नगर ते रूबी नगर हा रस्ता सरकारी कागदावर असून प्रत्यक्षात त्याचा वापर करू दिला जात नाही.
गणेश बिल्डर्स स्किम नंबर ३ येथे तारेचे कुंपण टाकून रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे येथे राहणाऱ्या ९० पेक्षा जास्त कुटुंबातील महिला, पुरुषांना त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने जुळे सोलापूर येथील गणेश बिल्डर्स स्कीम नंबर 3, अमोल नगर, लोखंडवाला पार्क येथील नागरिकांनी याबाबत बैठक घेतली.
या बैठकीस वरील तिन्ही नगरांतील नागरिक उपस्थित होते. महापालिका आयुक्त, आमदार, खासदार, पालकमंत्री, भाजपा शहराध्यक्ष यांना निवेदन दिले असून 20/25 वर्षे झाले रस्ता व ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होत नसल्याने महापालिकेच्या होणार्या निवडणुकीत सोसायटीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे.
तसेच अमोलनगर ते रबीनगर रस्त्यावर बहिष्कारचे बॅनर लावण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार्या उमेदवाराला कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही असे सांगण्यात आले. नागरिकांनी यावेळी निषेधाच्या घोषणा दिल्या. या सोसायटीतील नागरिकांना रस्ताच नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवडणुकीवर बहिष्कार घालण्याबाबतचे निवेदन देण्याचे ठरविले.








