मुंबई,दि.11: आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (दि.10) निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्र प्रकरणी निकाल द्यावा असे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. तसेच भरत गोगावलेंची प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.
ठाकरे आणि शिंदे यांचा एकही आमदार अपात्र न ठरवता सगळ्या आमदारांना अपात्रतेपासून नार्वेकरांनी अभय दिलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर एबीपी माझाला मुलाखत दिली.
राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांच्यावर शिवसेनेचे अधिकृत व्हिप म्हणून शिक्कामोर्तब केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला, असा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांच्या याच आरोपाला राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले.
शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी झालेली निवड तसेच पक्षातील सर्वाधिकाराच्या निर्णयाची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेली नाही. हे सगळं लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचवेळी शिवसेनेतील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना नसून राष्ट्रीय कार्यकारिणीला आहेत, असाही निवाडा त्यांनी केला. या सगळ्या कायदेशीवर गोष्टींवर राहुल नार्वेकर यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनतेला पडलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
सर्वोच्च न्यायालयात सुनील प्रभु यांची प्रतोद म्हणून नियुक्ती योग्य ठरवली आणि भरत गोगावले यांची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा गैरसमज काहींनी समाजात पसरवला आहे. मात्र सत्य परिस्थिती ही आहे की- ज्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहळी झिरवळ यांनी मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू आणि गटनेते म्हणून अजय चौधरी यांना निवडलं, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचं पत्र होतं, एकनाथ शिंदे यांचं कोणतंही पत्र झिरवळ यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे त्यांना एकच राजकीय पक्ष असल्याचं वाटलं. त्यामुळे त्या परिस्थितीत त्यांनी अनुक्रमे प्रभू आणि चौधरी यांची निवड केली.
पण 3 जुलै 2022 रोजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत निर्णय घेतला. त्यावेळी अध्यक्षांकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी दोघांची पत्रे होती. राहुल नार्वेकर यांना पक्षात फूट पडली अशी कल्पना होती. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी केवळ विधिमंडळातील ताकद पाहून गोगावले आणि शिंदेंची केलेली निवड चुकीची आहे. कारण, त्यावेळी नार्वेकरांनी राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवायला हवं. त्यामुळे राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवला, प्रतोद आणि पक्षनेता ठरवल्यामुळे तो भाग चुकीचा असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अध्यक्षांनी आता राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावं, आणि त्यांनतर प्रतोद आणि विधिमंडळ नेत्यांची निवड करावी. त्यामुळे हा गैरसमज जो पसरवला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे मी जो निर्णय दिला आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईड लाईन्स पाळून १०० टक्के दिला.