Jitendra Awhad On Shekhar Bagade: पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप, ट्विट केली ऑडिओ क्लिप

0

ठाणे,दि.१५: Jitendra Awhad On Shekhar Bagade: पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेखर बागडे (Shekhar Bagade) यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. खुद्द राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत शेखर बागडे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं असून विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. ही ऑडिओ क्लिप शेखर बागडे यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, कशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार होतोय, यासंदर्भात त्यांनी ट्वीटमध्ये दावे केले आहेत.

अजित पवारांचे आरोप

अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शेखर बागडे यांचा उल्लेख केला. “शेखर बागडे ठाणे जिल्ह्यात काम करतोय, त्याने मोठी मालमत्ता निर्माण केली आहे. एक पोलीस एवढी बेहिशोबी मालमत्ता कशी काय गोळा करू शकतो? सरकारने यासंदर्भात चौकशी करावी”, सरकारचा दरारा असला पाहिजे, तोच राहिलेला नाही. कारण सगळ्यांनीच आओ-जाओ घर तुम्हाला अशा पद्धतीने भ्रष्टाचार करायला सुरुवात केली आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप | Jitendra Awhad On Shekhar Bagade

दरम्यान, यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं असून त्यात सविस्तर भूमिका मांडली आहे. “शिवसेना, भाजपामध्ये ज्या गोष्टीवरुन ठाण्यात वाद सुरु आहे; तो मानपाडा येथील पोलीस निरीक्षक शेखर बागडे याच्यामध्ये प्रचंड पैशाचा उन्माद आहे. ‘मी त्यांना फाट्यावर मारतो’ हे त्याचे आवडते विधान. पैशाच्या मग्रुरीमुळे आपण कोणालाही विकत घेऊ शकतो हे त्याच्या डोक्यामध्ये फिट बसले आहे. आज अजित पवार यांनी त्याची प्रॉपर्टी वाचून दाखवली. ही प्रॉपर्टी त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीच्या २० टक्केही नाही. अजून तर त्याची खूप प्रॉपर्टी इकडे-तिकडे पसरलेली आहे”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

“खालापूर येथे एक फूड कोर्ट पेट्रोल पंप MSRDC ने ज्याच्या नावावर दिले होते त्याच्याकडून जबरदस्तीने पार्टनरशिप घेऊन शेखर बागडेनं मिळवलं. त्याला चेक दिला, पण नंतर त्या चेकचा व्यवहार पूर्ण न करताच ते फूड कोर्ट पेट्रोल पंप आणि त्याच्या आजूबाजूची सगळी जागा शेखर बागडेने बळकावली. प्रचंड दादागिरी करुन मूळ मालकास तेथे येण्यासही मज्जाव केला आहे. तो मूळ मालक तेथे गेल्यास स्थानिक पोलीसच त्या मूळ मालकाला अटक करतात. कारण बागडे साहेबांचा भाग आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“तिथे बाऊन्सर बसवले आहेत. तिथे गुंडांची ये-जा सुरु असते. आणि दिवसाला जवळ-जवळ २० ते २५ लाख रुपयांची कमाई तिथे होते. पेट्रोल पंपाचा चेक आणि सीसीडेचा चेक हा अधिकृत असल्याने मूळ मालकाच्या खात्यावर जातो. उर्वरीत संपूर्ण रोख पैसे बागडे आपल्या घरी घेऊन जातो. या सगळ्या प्रॉपर्टीवर कर्ज आहे. त्या कर्जाचा EMI मात्र त्या गरीब मालकाला भरावा लागतो”, असं आपल्या पोस्टमध्ये आव्हाडांनी नमूद केलं आहे.

पोलीस दखल घेतात, पण त्यांना वरून फोन येतो

“पोलीसांकडे अनेक तक्रार येतात. पोलीस त्याची दखलही घेतात. शेवटपर्यंत जातातही. परंतु त्यांना वरुन फोन येतो. आता वरुन फोन कोणाचा येतो हे देवेंद्रजी फडणवीस यांना वेगळं सांगायला नको. अशा या शेखर बागडेबद्दल अजित पवारांनी अनधिकृत संपत् बद्दल विषय काढला. त्यामुळे मी ही अधिकची माहिती महाराष्ट्राला देत आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटच्या शेवटी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here