Jitendra Awhad On Narayan Rane: “हिंमत असेल तर प्रकाश आंबेडकरांना…” जितेंद्र आव्हाड यांचं नारायण राणेंना आव्हान

0

मुंबई,दि.१७: Jitendra Awhad On Narayan Rane: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा केंद्रीयमंत्री नारायण राणेंना आव्हान दिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच भाजपासह आरएसएसचा उल्लेख करत मोठं विधान केलं होतं. देशात लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे देशातील हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळांवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे संबंधित मंदिरांना भारतीय लष्कराने संरक्षण द्यावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, त्यांचं विधान भयानक आहे, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं.

जितेंद्र आव्हाड यांचं नारायण राणेंना आव्हान | Jitendra Awhad On Narayan Rane

नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी नारायण राणेंना खुलं आव्हान दिलं आहे. “हिंमत असेल तर प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेऊन दाखवा” असं आव्हान आव्हाडांनी दिलं आहे. त्यांनी ‘एक्स’ पोस्ट लिहून हे आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि आरएसएसचं राजकारण लक्षात घेता, हिंदूंची जिव्हाळ्याची पाच मंदिरे आहेत, ती लक्ष्य होऊ शकतात. यामध्ये ज्ञानव्यापी मशीद, रामजन्मभूमी अयोध्या, मथुरेचं शाही ईदगाह ही धार्मिक स्थळं कदाचित लक्ष्य केली जाऊ शकतात. म्हणून वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की, निवडणूक होईपर्यंत ही मंदिरे लष्कराच्या ताब्यात देण्यात यावीत.”

काय म्हणाले नारायण राणे?

प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांची आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दोस्ती झाली आहे. त्यामुळे त्यांची विचारसरणीही तिकडेच चालली आहे. असं असेल तर प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, हे भयानक विधान आहे. धार्मिक स्थळावर हल्ला होणार, याची माहिती प्रकाश आंबेडकरांना कोणत्या मार्गाने मिळाली? हे माहीत नाही. पण हे भयानक आहे. भाजपा हा राष्ट्राभिमानी पक्ष आहे. भाजपाची केंद्रात दहा वर्षे सत्ता आहे. एकच पंतप्रधान आहेत. त्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात असतील, तर याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here