ज्यांना साधी जागा मिळाली नाही त्यांना इतक्या गुप्त गोष्टी माहिती पडतील का: जितेंद्र आव्हाड

0

मुंबई,दि.१९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री बनायचे होते असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना बंड होणार हेसुद्धा माहिती नव्हती. ज्यांना साधी जागा मिळाली नाही त्यांना इतक्या गुप्त गोष्टी माहिती पडतील का? शरद पवारांच्या मनात काय याचे आकलन बावनकुळेंना कसं लागेल. पवारांच्या मनात काय हे त्यांच्या घरचे सांगू शकत नाही तर बावनकुळे काय सांगणार अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या दाव्यावर टोला लगावला आहे. 

काय म्हणाले होते बावनकुळे?

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ चा एक फॉर्म्युला तयार केला होता. त्यात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील असे ठरविण्यात आले होते. जेव्हा याची कुणकुण शिवसेनेच्या आमदारांना लागली तेव्हा त्यापैकी ४० आमदारांनी बंड पुकारले व मविआचे सरकार कोसळले असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला होता. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या दिवसापासून… जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री बनायचे होते हे बावनकुळेंना माहिती नव्हते. मी पहिला साक्षीदार आहे, शिंदेंनी मला काय सांगितले ते स्वत: नाकारू शकत नाहीत. हे सरकार बनलेही नव्हते त्याआधीपासून शिंदेंच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचं होते. बावनकुळे हवेत बोलत आहेत. शरद पवारांच्या मनात असे काहीच नव्हते असं त्यांनी सांगितले. 

तसेच सामान्य शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळत नाहीत, हेच बोलणे मंत्रालयात येते. कसंही करून लोकांच्या मनात टाका, सत्ता हीच आहे हे पटवून द्या, त्यामुळे जमावाजमव करण्याची सुरूवात होते. ७७-८० च्या दशकात इंदिरा गांधी यांना सगळे सोडून गेले होते. आमदार सोडून गेल्याने काही होत नाही. जनतेच्या हातात सर्वकाही असते. जुने सोडून गेल्याने पक्षात नवीन पोरांना संधी मिळते त्यात वाईट नाही असं त्यांनी सांगितले. तसेच गद्दार दिन लोकांच्या घराघरात गेलाय, ५० म्हटलं तरी लोकं पुढे बोलतात खोके, २० जून खोक्यांचा दिवस, गद्दार दिवस आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तो महाराष्ट्रातल्या घराघरात साजरा केला जाणार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here