मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत शरद पवारांनी खाजगीत ‘हा’ खुलासा केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले

0

मुंबई,दि.10: नवी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी 2024 मध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं (MVA) सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होतील असं शरद पवारांनी (Sharad Pawar) खासगीत सांगितलं असल्याचा खुलासाही केला. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया काहीशा उंचावल्या आहेत.

राज्यातील 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची पहिली पसंती उद्धव ठाकरे हेच आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. शरद पवार यांनी ही गोष्ट राष्ट्रवादीतील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत सांगितली होती, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष 2024 ची विधानसभा निवडणूक एकत्रितरित्या लढतील. या निवडणुकीत महाविकासआघाडीची सत्ता येईल. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच कायम राहावेत, ही शरद पवार यांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही
“शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो, त्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते, असं बाहेर पसरवलं जात आहे. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसून उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे,” असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here