ठाणे,दि.12: Jitendra Awhad: विवियाना मॉल मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह (Jitendra Awhad Bail) 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पण, आता आव्हाडांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाने आव्हाडांच्या वकिलांचा अर्ज मान्य केला आहे. 15 हजार रुपयांच्या कॅश बाँडवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) चित्रपट पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आधी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
काय आहे प्रकरण?
हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियांना मॉलमधील चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ झाला. त्यावेळी आव्हाडांचे कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये वादावादी झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जवळपास 100 कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येतंय. या दरम्यान आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवलं.
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीनाला तपास अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना 15 हजारांच्या कॅश बॉंडवर जामीन मंजूर केला.
जामीनाला विरोध
आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन देवू नये असा अभिप्राय तपास अधिकाऱ्यांनी ठाणे कोर्टात दिला होता. जितेंद्र आव्हाड हे बलवान राजकीय व्यक्तीमत्व असल्याने तपासात बाधा आणू शकतात, तसेच साक्षीदारांना धमकावू शकतात असा अभिप्राय तपास अधिकाऱ्यांनी दिला होता.