राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

0

मुंबई,दि.23: राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आमदारांची नियमित फेरसाक्ष घेतली जात आहे. ही सुनावणी 25 जानेवारीपर्यंत चालणार आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील आणि 31 जानेवारीपर्यंत जाहीर करतील अशी शक्यता आहे.

निकालासाठी विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे. दरम्यान आज जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी त्यांनी पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर याबाबत पुरावे कपाटात ठेवण्यात आले होते. मात्र ते गायब झाल्याचा दावा केला. 

पक्षांतर्गत निवडणुका झालेले पुरावे असलेली कागदपत्रे सुरक्षित कपाटातून गायब झाल्याचा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उलटतपासणीत आव्हाडांना अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारले. यामध्ये आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या असे उत्तर आव्हाड यांनी दिले. परंतु त्याचे पुरावे असलेली कागदपत्रे कपाटातून गायब करण्यात आल्याचे ते म्हणाले. शिवाय दोन व्यक्तींवर त्याची जबाबदारी होती त्या व्यक्तीच पक्ष सोडून गेल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. 

“जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्र म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही,” असं आव्हाड म्हणाले आहेत. 

जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते का? त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात का? असा सवाल करण्यात आला. यावर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळी मी स्वतः उपस्थित होतो. यावेळी अनेकांनी भाषणे केली. सगळे वरिष्ठ नेते उपस्थित होते, असे आव्हाड म्हणाले. 

अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी मी निवडणूक कमेटीचा भाग नव्हतो. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती असल्याच पाहिजे याची गरज वाटत नाही असं म्हणाले. जुलै ते सप्टेंबर दरम्यान ब्लॉक कमिटीच्या निवडणूका झाल्या होत्या का? अशी विचारणा करण्यात आली असता आव्हाडांनी होय माझ्या माहितीनुसार घेण्यात आल्या होत्या असं उत्तर दिलं. जिल्हा कमिटीच्या निवडणूका झाल्या होत्या का? असं विचारलं असता आव्हाडांनी सतत तोच तोच प्रश्न विचारला जात आहे. मी सांगितलं की सगळया निवडणूका घेतल्या गेल्या होत्या असं स्पष्ट केलं. 

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रिय निवडणूका झाल्या होत्या असंही उत्तर त्यांनी दिलं. दरम्यान पुरावे मागण्यात आले असता जितेंद्र आव्हाडांनी इथे पुरावे कुठून आणू? असा संताप व्यक्त केला. हो किंवा नाही असं उत्तर देण्यास सांगितलं असता, ते म्हणाले की, “सगळे पुरावे आहेत. ते सगळे पुरावे गुप्ततेच्या दृष्टीने कपाटात ठेवले होते. मात्र त्यातील दोन पदाधिकारी अजित पवार गटाच्या हाताला लागले. त्यांनी ह्या कागदपत्रांच काय केलं माहिती नाही. त्यांनी कोणती कागदपत्रं नेली माहिती नाही”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here